लोणी काळभोर: गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पत्नीचे निधन झाले असतानाच आता पतीचेही अल्पशा आजाराने निधन झाल्याची दुःखद घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथे आज सोमवारी (ता. 27) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पती-पत्नीचा पंधरा दिवसाच्या आत मृत्यू झाल्याने लोणी काळभोर गावावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश उर्फ अरुण अमृत काळभोर (वय 67, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रकाश काळभोर यांची पत्नी उज्वला काळभोर (वय 63 ) यांचा गुरुवारी (ता. 9) उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. उज्वला काळभोर यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रकाश काळभोर यांची प्रकृती खालावली होती. त्यांना हडपसर येथील योग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, प्रकाश काळभोर यांची उपचारादरम्यान सोमवारी (ता. 27) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत आज (सोमवारी) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. प्रकाश काळभोर यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. लोणी काळभोरचे उद्योजक संजय काळभोर हे त्यांचे पुत्र तर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचे ते चुलतबंधू होत.
लोणी काळभोर गावावर पसरली शोककळा
उज्वला काळभोर यांच्या निधानातून सावरण्याअगोदरच, अवघ्या पंधरा दिवसाच्या आत प्रकाश काळभोर यांचेही निधन झाले आहे. यामुळे काळभोर कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. काळभोर दाम्पत्यांच्या निधनामुळे लोणी काळभोरकरांच्या मनाला चटका लागला आहे. या दोन्ही दुख:द घटनेमुळे लोणी काळभोर गावावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.