पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तीला जर माझ्यासोबत बोलू दिले नाही, तर तुमच्या मुलासह जावयाला मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २२ वर्षीय आरोपीविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच काही दिवसापूर्वी याच आरोपीने २२ वर्षीय फिर्यादी मुलीला देखील माझ्याशी लग्न केले नाहीस, माझ्याशी बोलली नाहीस, तर मी तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली होती. यश दादा घुले (वय-२२, रा. मांजरी, हडपसर) असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यश आणि फिर्यादी मुलगी हे दोघे परिचयाचे आहेत. आरोपी यश त्यांच्या घरात घुसला आणि त्याने मुलीला माझ्याशी लग्न कर अन्यथा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच मुलीचा हात ओढून माझ्यासोबत चल बोलायचे आहे, म्हणत तो तिला घराबाहेर घेऊन जायला लागला.यावेळी मुलीची आई त्याला समजावण्यासाठी आली.
त्यावेळी आरोपी यश याने त्यांना देखील तुम्ही तीचे लग्न दुसरीकडे कसे करता बघतोच, मी हिचे लग्न होऊ देणार नाही, तुम्ही जर हिला माझ्यासोबत बोलू दिले नाही, तर तुमच्या मुलाला आणि जावयाला मारून टाकीन अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या मुलीने पोलिसात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गांधले करत आहेत.