पुणे : पुण्यातील हडपसर भागात रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना रस्त्यात आडवी लावलेली रिक्षा बाजूला काढण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रिक्षाचालकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन अंबादास शेलार (वय-२८, रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. शेलार याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक प्रमोद ढाकणे (वय-३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी पोलीस शिपाय हे हडपसर पोलीस ठाण्यात रात्रपाळीस होते. पोलीस नियंत्रण कक्षाच्या आदेशाने हडपसर भागातील सिझन्स मॉल परिसरात रात्री नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी रस्त्यात शेलार याने रिक्षा आडवी लावली होती.
पोलीस नाईक ढाकणे यांनी त्याला रिक्षा बाजूला काढण्यास सांगितले. त्यावेळी रिक्षाचालक शेलारने ढाकणे यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून दगड फेकून मारला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.