पुणे : पुण्यातील बाणेर येथील तीन रूफटॉप पब रेस्टॉरंटवर (हॉटेल) महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली आहे. तेथील पत्राशेड व अनधिकृत बांधकाम पाडले. आज शनिवारी दुपारच्या सुमारास बांधकाम विभाग झोन तीनच्यावतीने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. बाणेर येथील हॉटेल इमेज रेस्टोबार, आइस अँड फायर ( बाणेर हायवे लगत) आणि हॉटेल हाईव्ह (रांका ज्वेलर्सच्यावर बाणेर) या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ११ हजार ९२५ चौरस फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले.
या कारवाईत बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, बांधकाम विभागा झोन तीनचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्यासह उप अभियंता प्रकाश पवार, कनिष्ठ अभियंता अजित सणस, संदीप चाबुकस्वार, केतन जाधव व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर व दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, बाणेर येथील एकूण नऊ रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याव्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाने दिली आहे.