बारामती : प्रेमाला उपमा नाही आणि प्यार किया तो डरना क्या ही गाणी चित्रपटातच शोभून दिसतात. प्रत्यक्षात जर अशी नाती आणायची झाली तर ती सध्याच्या जमान्यात विरोधाभासी वाटतात. तसेच प्रेमविवाह करताना वय, जात, धर्म, पंथ अशा बाबींचा विचार केला जात नाही. असाच एक प्रेमविवाह बारामतीच्या माळेगावात झाला आहे. ६० वर्षाच्या निवृत्त शिक्षकाने २० वर्षाच्या मुलीशी प्रेमविवाह केला आहे. विशेष बाब म्हणजे ज्या शाळेत ते शिकवत होते, त्याच शाळेतील माजी विद्यार्थिनीशी झालेला हा प्रेमविवाह सध्या बारामती तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हे सेवानिवृत्त शिक्षक राहतात. या ६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने नुकतेच त्याच शाळेत शिकणाऱ्या वीस वर्षीय माजी विद्यार्थिनीशी प्रेम विवाह केला आहे. कोरोनाच्या काळात पत्नीचे निधन झाले आणि हे शिक्षक एकाकी पडले. उतार वयात आधार म्हणून त्यांनी हा प्रेमविवाह केल्याची गावात चर्चा सुरु आहे.
दरम्यान, या शिक्षकाला नातवंडे देखील आहेत. मग या वयात त्यांनी विवाह करावा का? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. नातेवाईकांना तर पडलाच, पण पोलिसांना देखील पडला आहे. म्हणूनच माळेगावच्या पोलीस ठाण्यात पोलिसांनी सबुरीने घेतले, तसेच त्यांना समजावून सांगितले, धाक देखील दाखवला, पण या दोघा नवदाम्पत्याला काहीच फरक पडला नाही.
तसेच २० वर्षीय वधू असलेल्या माजी विद्यार्थिनीने देखील आपण शुद्धीवर राहून, विचार करूनच हा विवाह केला आहे. मी या शिक्षकाला सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला, तर यात काहीच गैर नाही, असा दावा संबंधित शिक्षकाने केला आहे.