अमरावती : पुण्यातील पब संस्कृतीचा मुद्दा राज्यात तापलेला असतानाच अमरावती जिल्ह्यात रेव्ह पार्टी उजेडात आली आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर जिल्ह्यातील वरूडजवळ एका रेव्ह पार्टीवर मध्य प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला. या छाप्यात ११ तरुणींसह ३४ पुरुषांना अटक करण्यात आली आहे.
वरूडपासून काही अंतरावर मध्य प्रदेशातील नेचर प्राईड व वॉटर पार्क येथे बुधवारी मध्यरात्री रेव्ह पार्टी सुरू होती. रिसॉर्टमध्ये मोठ्या आवाजात डीजे लावून नाच गाणे सुरू होते. या प्रकाराची माहिती मिळताच मध्य प्रदेशातील मुलताई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. यावेळी मद्यधुंद तरुणींसह एकूण ४५ जण आढळून आले. पोलिसांनी १४ तरुणी आणि ३४ पुरुषांना ताब्यात घेतले. यामध्ये महाराष्ट्रातील वरूड, प्रामुख्याने नागपूर व अमरावती जिल्ह्यातील अनेकांचा समावेश आहे.
दरम्यान, रिसॉर्टचा मालक अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील असून रेव्ह पार्टी अत्यंत छुप्या पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. घटनास्थळावरून विदेशी मद्याच्या दोन पेट्या, ३७ बीअर बॉटल, ग्लास, म्युझिक सिस्टीम, स्पीकर जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.