इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. तपासाची चक्रे गतीने फिरवत तीन आरोपींना अवघ्या तीन तासांत अटक करण्याची कामगिरी इंदापूर पोलिसांनी केली.
पिन्या उर्फ प्रदीप कल्याण बागल, तेजस अनिल वीर, माऊली उर्फ शुभम महादेव भोसेकर (तिघे रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी (दि.25 ) इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे शहरातील जुन्या पुणे-सोलापूर मार्गावरून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शासकीय वाहनातून (क्र. एम. एच. 42/ ए. एक्स. 1661) आपल्या कार्यालयाकडे जात होते. त्यांची गाडी संविधान चौकात आली असताना तेथे नंबर नसलेल्या चारचाकी गाडीतून आलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी वाहन चालक मल्हारी मखरे यांच्या अंगावर चटणीची पुड टाकून लोखंडी रॉडने वाहनावर जोरदार हल्ला केला. त्यांनी गाडीच्या काचा लोखंडी गजाने फोडल्या. यावेळी गाडीमध्ये असलेले श्रीकांत पाटील व त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत. मात्र शासकीय वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तहसीलदार श्रीकांत पाटील यांची इंदापूर तालुक्याची ही दुसरी टर्म असून त्यांनी अवैध धंदे, विशेषतः वाळूमाफिया यांच्यावर चाप बसविला. त्यातून त्यांच्यावर भरदिवसा, गजबजलेल्या रस्त्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. विशेष म्हणजे येथून तहसील कार्यालय हाकेच्या अंतरावर तर पोलीस ठाणेदेखील जवळ असताना या झालेल्या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.
यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले, अवैद्य धंद्याचा बिमोड करण्याच्या आपल्या कामामुळे दुखावलेल्या लोकांनी हा प्रकार घडवून आणला असावा. पुढील काळातदेखील नियमितपणे ही कारवाई सुरु रहाणार आहे. लोकांनीही अशा प्रवृत्तींना जवळ करु नये.