बारामती, (पुणे) : पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सोनवडी-सुपेच्या (ता. बारामती) तत्कालीन ग्रामसेविकेच्या चांगलेच अंगलट आले आहे. या खटल्यात ग्रामसेविका दोषी आढळल्याने बारामती न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षेसह २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दिपाली जगन्नाथ कुतवळ (वय-३७, पद-ग्रामसेवक, सजा सोनवडी-सुपे, ता. बारामती, जि. पुणे (वर्ग-३) (बारामती पंचायत समिती कार्यालय)असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. सदर प्रकार हा सन फेब्रुवारी २०१७ मध्ये घडला होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसेविका दिपाली कुतवळ यांनी घरकुल मंजूर करून देण्यासाठी एका तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दिपाली कुतवळ यांना तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी दिपाली कुतवळ यांच्या विरोधात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तत्कालिन पोलीस निरीक्षक अर्चना डिकर यांनी या खटल्याचा सखोल तपास करून बारामती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. त्याचा स्पेशल केस क्रमांक १७१/२०१८ असा आहे. या खटल्यात लोकसेविका दिपाली कुतवळ यांच्याविरद्ध आरोप सिद्ध झाल्याने, न्यायालयाने कुतवळ यांना ५ वर्षाची शिक्षा व २५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा व तसेच दंड न भरल्यास वाढीव ०६ महिन्याची शिक्षा सुनावली आहे. तर सदर खटल्यात शासनाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता कल्पना नाईक यांनी कामकाज पाहिले.