यवत : येथील डॉ. दिगंबर पांडुरंग पाथ्रूडकर यांचे गुरूवार (दि. 23) रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 95 वर्षे होते.
यवत येथील ज्येष्ठ म्हणून डॉ. दिगंबर पांडुरंग पाथ्रूडकर परिचित होते. यवत येथील ज्येष्ठवर्ग त्यांना देव माणूस म्हणून उल्लेख करीत असत. डॉ. दिगंबर पांडुरंग पाथ्रूडकर यांचा देव माणूस म्हणून उल्लेख करणे कदाचित तितके पुरेसे होणार नाही. मनुष्याला देव माणूस बनण्याचे कसब शिकविणारे देव माणूस! असाच त्यांचा उल्लेख करावयास हवा कारण त्यांच्याच संस्कारात घडलेले डॉ. पराग पाथ्रूडकर आज जनसेवेचा वसा तितक्याच नेटाने सांभाळत आहेत. रुग्णसेवा हा व्यवसाय नसून ती मनुष्य सेवा आहे. हा विचार डॉ. दिगंबर पांडुरंग पाथ्रूडकर यांनी रुजविला. तोच संस्कार त्यांनी डॉ. पराग पाथ्रूडकर यांना देखील दिला आहे.
डॉ. दिगंबर पांडुरंग पाथ्रूडकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून यवत येथे रुग्ण सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. त्यानंतर यवत येथेच आपले क्लिनिक सुरु करून तब्बल 60 वर्षे गरीब गरजू रुग्णांची सेवा केली. अत्यल्प शुल्क ते सुद्धा असल्यास द्यावे, अशा वृत्तीने ते जनसेवा करायचे.
सेवाभावी वृत्तीने रुग्ण सेवेला वाहून घेतलेले, सामाजिक भान असणारे, सर्वांना सढळ हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
‘गरीबांचे डॉक्टर’ म्हणून ख्याती असलेले डॉ. दिगंबर पांडुरंग पाथ्रूडकर यांच्याजाण्याने यवत परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. पराग पाथ्रूडकर, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ.दिगंबर पांडुरंग पाथ्रूडकर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता यवत येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.