सोलापूर : लाचखोर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ३ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या यु-डायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. सोमवारी ते स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहात ताब्यात घेतलं. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरचे उपाधीक्षक संजीव पाटील म्हणाले, शिक्षण संस्था संचालक असलेल्या एका तक्रारदाराने या संदर्भात आमच्याकडे तक्रार केली होती. आपल्या शाळेतील वर्गवाढीचा प्रस्ताव तक्रारदाराने शिक्षण विभागाकडे पाठविला होता. यासाठी यु-डायस प्रणालीद्वारे वरिष्ठ कार्यालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यासाठी शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
दरम्यान, लाचेची ही मागणी असल्याचे आमच्या पडताळणीमध्ये समोर आले होते. लाचेच्या या रकमेपैकी २५ हजार रुपये स्वीकारताना शिक्षण अधिकाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी काही अपसंपदा जमा केली आहे का याची देखील चौकशी केली जाईल असे ते पुढे म्हणाले.