इगतपुरी : तालुक्यातील भावली धरणात पाच जणांचा बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत नाशिकरोड येथील गोसावीवाडीतील एकाच कुटुंबातील तीन मुली व दोन मुलांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी नाशिकरोड येथील गोसावीवाडीतील एकाच कुटुंबातील काही सदस्य रिक्षाने इगतपुरी येथील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास यातील काही युवक, युवती धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने युवती बुडू लागल्या. त्या घाबरून ओरडत असल्याचे पाहून बाजूला उभ्या असलेल्या तिघांनी पाण्यात उड्या घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही खोल पाण्याचाअंदाज न आल्याने पाचही जण बुडाले. स्थानिक आदिवासी तरुणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु उपयोग झाला नाही.
या तरुणांनी या युवक, युवतींना पाण्याबाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या सर्वांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेतून तसेच ठाकूर रुग्णवाहिका व १०८ रुग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाचही जणांना मयत घोषित केले. त्यानंतर मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे : अनस खान दिलदार खान (१७), नाझिया इमरान खान (१५), मिसबाह दिलदार खान (१६), हनीफ अहमद शेख, (२४) व ईकरा दिलदार खान (१४).