नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा कल सध्या वाढला आहे. त्यानुसार, विविध कंपन्यांकडून चांगला परतावा देखील दिला जात आहे. त्यातच भारतीय शेअर मार्केटने एक नवा इतिहास रचला आहे. ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ अर्थात ‘बीएसई’वर कंपन्यांचे मार्केट कॅप पहिल्यांदाच 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे.
‘बीएसई’च्या वेबसाईटनुसार, एक्स्चेंजमध्ये लिस्टेड सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप मंगळवारी (दि. 21) 412 लाख कोटी रुपयांच्यावर गेले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून मार्केट कॅपमध्ये 633 अब्ज डॉलरहून अधिक वाढ झाली आहे. ‘बीएसई’ सेन्सेक्स अजूनही 1.66% त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली आहे. तर ‘बीएसई’ मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकाने विक्रमी उच्चांक गाठला आहे.
अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँग या चार देशांच्या शेअर बाजाराचे मार्केट कॅप सध्या 5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. अमेरिका 55.65 ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपसह आघाडीवर आहे. त्यानंतर चीन, जपान आणि हाँगकाँग या देशांचा समावेश आहे. त्यात आता बीएसईची वाढ झाली आहे.