पुणे : फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर लवकरच मेट्रो धावण्याची चाचणी घेणे शक्य होणार आहे. चाचणीनंतर फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक हा मार्ग प्रवाश्यांसाठी खुला करण्यात येईल.
पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक हा 12 किमीचा मार्ग उन्नत असून उर्वरित मार्ग भूमिगत आहे. या 12 किमी उन्नत मार्गाच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी सोमवारी पूर्ण करण्यात आली.
या 12.064 किमीच्या उन्नत मार्ग पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींवर मात करण्यात आली. सर्वात मोठी अडचण सैन्यदलाकडून हॅरिस पूल ते खडकी येथील जागा मिळवणे ही होती. त्यासाठी सैन्यदलाकडे निरंतर पाठपुरावा करून जुलै 2022 मध्ये मेट्रो उभारणीस जागा देण्यात आली. सैन्यदलाकडून या मार्गास जमीन मिळण्यास विलंब झाला तरी देखील मेट्रोने काम न थांबवता रेंजहील स्थानक ते खडकी आणि फुगेवाडी स्थानक ते हॅरिस पूल या टप्प्याची कामे चालू ठेवली आणि वेळेत पूर्णत्वास नेली.
सोमवारी शेवटच्या सेगमेंटची उभारणी केल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते हॅरिस पूल आणि रेंजहील स्थानक ते खडकी यामधील गॅप भरण्यात येऊन व्हायाडक्तचे काम पूर्णत्वास येत आहे. कोरोना काळात सर्वच मोठे प्रकल्प ठप्प पडले आणि त्याचा फटका महामेट्रोलाही बसला. या भागामध्ये वाहतूक नियमन ही अत्यंत्य गुंतागुंतीचे होते. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून खडकी येथील वाहतूक नियमन करण्यात आले व आपल्या नियोजित वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले.
फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक व गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावरील कामे 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन मेट्रोने केले आहे. त्याला अनुसरूनच कालच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी झाली. सैन्यदलाकडील जमीन, कोरोना आणि वाहतूक नियमन इत्यादी अडचणींवर मात करून नियोजित वेळेत या 12.064 किमी उन्नत मार्गाचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2022 अखेर हे काम पूर्णत्वास घेऊन जाणे शक्य होईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.