पुणे : महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ जागांसाठी आज (२० मे) मतदान प्रक्रिया पार पडली. या १३ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
तर कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४१.७० टक्के मतदान झाले, तर दिंडोरीमध्ये सर्वाधिक ५७.०६ टक्के मतदान झाले आहे. मात्र, पाच टप्प्यातील हे सर्वात निचांकी मतदान असून देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७३ टक्के मतदान झाले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी सुमारे ४८.६६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. भिवंडी -४८.८९, धुळे -४८.८१, दिंडोरी -५७.०६, कल्याण – ४१.७०, उत्तर मुंबई – ४६.९१, मुंबई उत्तर मध्य – ४७.३२, मुंबई उत्तर पूर्व – ४८.३७, मुंबई उत्तर पश्चिम – ४९.७९, दक्षिण मुंबई – ४४.२२, मुंबई दक्षिण मध्य – ४८.२६, नाशिक – ५१.१६, पालघर – ५४.३२, ठाणे – ४५.३८ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ५७.०६ टक्के मतदान हे दिंडोरीमध्ये आणि सर्वात कमी ४१.७० टक्के मतदान कल्याणमध्ये झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ८ राज्ये आणि जम्मू-काश्मीरमधील एका केंद्रशासित प्रदेशातील ४९ जागांसाठी मतदान झाले. या जागांवर सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५६.६८ टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७३.०० टक्के आणि महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान झाले.
देशात सरासरी ५४.६८ टक्के मतदान
देशात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५४.६८ टक्के मतदान झाले. यामध्ये बिहार- ५२.३५, जम्मू-काश्मीर ५४.२१, झारखंड – ६१.९०, लडाख – ६७.७५ महाराष्ट्र-४८.६६, ओडिशा-६०.५५, उत्तरप्रदेश-५५.८० आणि पश्चिम बंगालमध्ये ७३.०० टक्के इतके मतदान झाले आहे. या आकडेवारीनुसार सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये ७५.६६ टक्के मतदान तर सर्वात कमी ४८.६६ महाराष्ट्र राज्यात झाले.
निवडणूक आयोगाने सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी जाहीर केली असून या टक्केवारीत बदल होण्याची शक्यता आहे, असेही आयोगाच्या वतीने सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. त्या सगळ्यांची एकूण स्पष्ट माहिती येण्यास उशीर होऊ शकतो, असेही आयोगाने स्पष्ट केले.