पुणे :‘राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांमध्ये मिळत नव्हता वाटा म्हणूनच गद्दारांनीच केलाय राज्यातील तरूणांचा घाटा’असा फलक ठाकरे समर्थकांनी शुक्रवार पेठेत लावला आहे. ‘उद्धवचा वाटा ,महाराष्ट्राचा घाटा’ अशा आशयाचे फलक लावत प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरे समर्थकांनी पोस्टरद्वारेच प्रत्युत्तर दिले आहे. यानिमित्ताने शिंदे-ठाकरे गटात पोस्टर वॉर सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच राज्यातून वेदान्ता फॉक्सकॉन आणि टाटा-एअर बस प्रकल्प बाहेर गेल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोणत्या सरकारमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेले यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातून किती प्रकल्प बाहेर गेले याची यादी देत बाळासाहेबांची शिवसेनेने शहराच्या विविध भागात फलक लावत ठाकरे यांना लक्ष्य केले होते. ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’अशा आशयाचे फलक शिंदे गटाने फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता येथे लावले होते.
दरम्यान, त्यालाच उद्धव ठाकरे शिवसेनेकडून उत्तर देण्यात आले आहे. शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम परिसरात गद्दारांमुळेच राज्याला तोटा झाल्याचा आरोप फलकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आला आहे.