ब्रातीस्लावा : स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला झाला. एका सभेला संबोधित करताना हल्लेखोराने त्यांचा पाय आणि पोटावर अनेक गोळ्या झाडल्या. यात ते गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रॉबर्ट फिको यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. उपचारादरम्यान त्यांच्यावर मृत्यू ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्लोवाकियाची राजधानी ब्रातीस्लावा येथून जवळपास १५० किमी दूर हँडलोवा शहरात पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी एका सभेला संबोधित केले. यावेळी एकाने त्यांचा पाय व पोटावर अनेक गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती रॉबर्ट फिको यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून देण्यात आली. फिको यांना तातडीने विशेष हेलिकॉप्टरने बँका बायस्ट्रीका येथील रुग्णालयात भरती केले. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करीत आहेत. पण फिको यांची प्रकृती फारच चिंताजनक आहे.
त्यामुळे पुढील काही तास त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे वृत्त शासकीय माध्यमांनी दिले. रॉबर्ट फिको यांना लक्ष्य करणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जुराज सी (७१) असे हल्लेखोराचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्लोवाकियाचे राष्ट्रपती जुजाना कॅपुतोवा यांच्यासह रशिया, अमेरिका, इंग्लंडसह जगातील अनेक देशांनी रॉबर्ट फिको यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान, ५९ वर्षीय रॉबर्ट फिको हे रशियाचे खंदे समर्थक आहेत, त्यांनी प्रदीर्घ काळापासून स्लोवाकियाचे पंतप्रधान पद भूषवले आहे.