सोलापूर: डान्स बारमधील मुलींसोबत डान्स करतानाचे व्हिडिओ शूट करून ते व्हायरल करण्याची धमकी देत एका प्राध्यापकाला दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. ही घटना २५ मार्चपासून ते आज आजतागायत सोलापुरातील डान्सबार आणि विविध ठिकाणी घडली.
प्रवीण भानुदास कांबळे (वय ३७, रा. कसबा पेठ, माढा, जि. सोलापूर) असे खंडणीची मागणी होत असलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिसांनी आरोपी अनमोल केवटे, महेश कांबळे, आसिफ शेख, नागेश विराजदार आणि वंदे नवाज शेख (रा. सर्व मंडप, ता. दक्षिण सोलापूर) अशा पाच जणांविरुद्ध भादवी कलम ३८५, ५०६ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २५ मार्च २०२४ रोजी सोलापुरातील एका डान्स बारमध्ये आरोपींनी व्हिडिओ काढला होता. यानंतर ११ एप्रिल २०२४ ते आजतागायत आरोपींनी संगनमत करून शासकीय विश्रामगृह आणि मंडप येथील विद्यालय येथे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी प्रवीण कांबळे यांच्या संमतीशिवाय त्यांचे डान्स बारमधील मुलींसोबत नाचतानाचा फोटो आणि व्हिडिओ काढल्याचे सांगून हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. दोन लाख रुपये न दिल्यास हे फोटो आणि व्हिडिओ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच संतोष पाटील महाविद्यालय यांच्या मेलंवर ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार असल्यासचे सांगितले. प्राध्यापक कांबळे यांच्या विरोधात कॉलेज संस्था विद्यापीठ व उच्च शिक्षण विभाग पुणे यांच्याकडेही मेलद्वारे तक्रारी अर्ज दाखल असे स्टेटस ठेवून मध्यस्थीमार्फत त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होते. याचबरोबर हे व्हिडिओ सोशल मीडियांवर व्हायरल करण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. याला वैतागून अखेर प्रवीण भानुदास कांबळे यांनी सदर बाजार पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध आपली सविस्तर फिर्याद नोंदविली यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास महिला फौजदार व्हट्टे हे करीत आहेत.