मुंबई: मुंबईतील घाटकोपरमधील झालेल्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. ढिगाऱ्याखालून आणखी दोन जणांचे मृतदेह बाहेर काढले असून मृतांची संख्या 16 वर पोहचली आहे. 13 मे रोजी मुंबईत अचानक आलेल्या वादळामुळे घाटकोपरमधील पंत नगर भागात असणारे एक मोठे होर्डिंग पडले होते. त्यामुळे होर्डिंगच्या आजूबाजूची अनेक घरे आणि एक पेट्रोल पंप त्याखाली गाडला गेला. तसेच या अपघातात मोठ्या संख्येने लोक देखील होर्डिंगखाली गाडले गेले. या दुर्घटनेच्या चार दिवसानंतर मदत आणि बचावकार्य पूर्ण झाले आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी माहिती दिली.
दरम्यान होर्डिंग कोसळल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. मात्र, या घटनेचा एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. फक्त 17 सेंकदाचा असलेला हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. या व्हिडिओमध्ये क्षणात होत्याचे नव्हते झाल्याचे द्दश्य दिसत आहे. आता या दुर्घटनेची चौकशी सुरु राहणार आहे.
मुंबईत होर्डिंग कोसळतानाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ#Mumbai #ghatkopar pic.twitter.com/tFriClz9fO
— jitendra (@jitendrazavar) May 16, 2024
या दुर्घटनेमध्ये एनडीआरएफ, बीपीसीएल,एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिका यंत्रणांचा बचाव कार्यात समावेश होता. या सर्व यंत्रणांनी योग्य पद्धतीने बचावकार्य केल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. चौथ्या दिवशी बचावकार्य पूर्ण झाले आहे.