पुणे : मी शहरातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन प्रचार केला. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मी स्थानिक आणि विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीमधील अनेक आठवणी आहेत. पण यंदाची मतदानाची टक्केवारी लक्षात घेतल्यावर मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील आणि जो कोणी उमदेवार निवडून येईल. तो किमान २० ते २५ हजार मतांनी निवडून येण्याची शक्यता वसंत मोरे यांनी व्यक्त केली, ते आज वाडेश्वर कट्टयावर बोलत होते.
पुण्यातील शरद पवार गटाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्टयाचे आयोजन केले होते. यावेळी रविंद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी उपस्थित राहून इडली चटणी, शिरा खात दोघांनी निवडणुकीतील अनुभव सांगितले.
पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन महिना झाला असताना मला कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी खूप प्रेम दिले. मी ज्या पूर्वाश्रमीच्या (मनसे) पक्षात २० वर्ष राहीलो. त्या काळात (राज ठाकरे ) साहेबांनी खूप प्रेम दिले. पण पक्षातील (मनसे) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कधीच प्रेम दिले नाही. त्यांनी कायम पाय खेचण्याच काम केलं असल्याची खंत व्यक्त करीत म्हणाले भविष्यात प्रत्येकाचा हिशोब होणार असा इशारा वसंत मोरे यांनी पुण्यातील स्थानिक मनसेच्या नेत्यांना दिला.
यानंतर रविंद्र धंगेकर म्हणाले की, काँग्रेसकडून कसबा पोटनिवडणुक लढविण्याची संधी मिळाली. त्या संधीच सोनं केलं आणि त्या निवडणुकीला वर्ष होत नाही. तोवर आता लोकसभा निवडणुक लढविण्याची संधी दिली. त्यामुळे याही निवडणुकीत देखील मी विजयी होईल असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.