पंढरपूर: चंद्रभागा नदीपात्रातून लहान मोठ्या वाहनांमधून अवैधरित्या होत असलेल्या वाळू चोरीमुळे नदीपात्रात धोकादायक खड्डे पडले आहेत. यापूर्वी अनेक भाविकांचा अशा खड्ड्यांमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. उजनीतून सोडलेले पाणी पंढरपुरातील नदीपात्रात आल्यावर आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण होणार असल्याने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून अवैध वाळू उपसा रोखावा अशी मागणी भाविकांमधून होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळू उपशाविरुध्द विविध संस्था, संघटना आवाज उठवित आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हेतुपरस्पर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
नुकतेच उजनी धरणातून चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडण्यात आले असून हे पाणी पंढरपुरात आल्यानंतर या मोठमोठ्या खड्ड्यात बुडून भाविकांच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पंढरपूर नगरपरिषदेला याबाबत पत्र देऊनही उडवाउडवीची उत्तरे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत.