उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, शिंदवणे आदी गावांत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दोन दिवस सलग पाऊस आणि वातावरणातील गारवा यामुळे दुपारनंतर मतदानाचा टक्का समाधानकारक झाला. दुपारी थोडा वेळ शुकशुकाट दिसून आला. नवमतदारांसह ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, सुशिक्षितवर्गातच उदासीनता दिसून आली. उरुळी कांचन येथील १०४ वर्षे वयाच्या कलूबाई किसन जाधव यांनी मतदान केले.
उरुळी कांचन येथे बूथच्या परिसरात प्रथमोपचार सेवा देण्यासाठी आशासेविका कार्यरत होत्या. येथे शहरी मतदारांच्या उदासीनतेमुळे एकूण २२ बूथवर अवघे ५० टक्के मतदान झाले. भवरापूर गावात जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर एकूण मतदार ५९८ होते. त्यापैकी ४५१ (७५%) मतदान झाले. शिंदवणे गावात येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ६२ टक्के मतदान झाले.