लोणी काळभोर : अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.१३) दुपारच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्य झाला आहे. तर ७५ हून अधिक जन जखमी आहेत. मात्र अशाच प्रकारची दुर्घटना पुणे-सोलापूर महामार्गावर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व हवेलीत अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट असून महामार्ग हा अनधिकृत होर्डिंग्ज व फ्लेक्सच्या विळख्यात सापडला आहे. तर मागील पाच वर्षांपूर्वी कवडीपाट टोलनाका बंद झालेला असून त्याचा सांगाडा अद्यापही महामार्गावरच आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई होणार का? तसेच बंद पडलेल्या कवडीपाट टोलनाक्याचे करायचे काय? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फ्लेक्स व होर्डिंग्ज आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेली होर्डिंग्ज प्रवाशांसाठी अडचणीची ठरत असून, या होर्डिंग्जमुळे प्रवाशी, पादचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर, पंधरा नंबर, शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी कॉर्नर, माळी मळा, थेऊरफाटा, कुंजीरवाडी चौक, नायगाव फाटा, पेठ वाकडा पूल, सोरतापवाडी फाटा, इनामदारवस्ती, एलाईट चौक, तळवाडी चौक व खेडेकर मळा या परिसरात असंख्य अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज धोकादायकरित्या लावलेले आहेत.
दरम्यान, आर्यन टोलरोड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट व दौंड तालुक्यातील कासुर्डी या भागातील रस्त्याचे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर केले होते. चौदा वर्ष या कंपनीकडून टोलवसुली सुरु होती. त्याची मुदत मार्च २०१९ मध्ये संपल्यावर येथील टोलवसुली बंद झाली. त्यास पाच वर्षांहून अधिक काळ झाला. मात्र, अद्याप हे टोलनाके काढण्यात आले नसून त्याचे सांगाडे अद्यापही महामार्गावरच आहेत.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते सोलापूर या दरम्यान, महामार्गावर लावलेले अनधिकृत फ्लेक्स जानेवारी २०२४ ला काढले होते. मात्र, एनएचआयचे काम पुढे जाताच, पाठीमागे महामार्गावर अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आले. त्यामुळे पुन्हा पुणे-सोलापूर महामार्ग अनधिकृत होर्डिंग व फ्लेक्सच्या विळख्यात सापडला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
गतवर्षी याच महिन्यात कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतीत कवडीपाट टोलनाका व एमआयटी कॉर्नरजवळील अनधिकृत होर्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला दोन तरुण चिकटून गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने त्यांना तत्काळ उपचार मिळाल्याने दोन्ही तरुण या दुर्घटनेतून सुखरूप बचावले. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महावितरणाला जाग कधी येणार…
पूर्व हवेली विद्युत प्रवाहांच्या जवळ मोठ्या प्रमाणत अनधिकृत होल्डिंग तयार केलेल्या आहेत. या होल्डिंग मालकांवर महावितरण कारवाईचा बगडा का उगारीत नाही? एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तरच महावितरणाला जाग येईल का? जर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अनधिकृत फ्लेक्समुळे वाहतुकीस अडथळा
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी तर व्यवसायाची जाहिरात करणारे छोटे फ्लेक्स रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत खांबावर अथवा रिफ्लेक्टरवर चिटकवलेले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविले जातात…
एका बाजूला अनधिकृत जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला चौकाचौकात लाकडाचे पहाड बांधून धोकादायकरित्या जाहिरातीचे पोल उभारले जात आहेत. काही ठिकाणी तर पथदिव्यांच्या खांबांवर हीटलेस बांधले आहेत. परंतु, याकडे कारवाईच्या नावाखाली प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविले जात आहेत.
कारवाई कधी?
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक अनधिकृत होर्डिंग्ज धोकादायकरीत्या लावलेल्या आहेत. या धोकादायकरीत्या लावलेल्या होर्डिंग्जमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाच्या वतीने कारवाई होणार का ? एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत फ्लेक्स जानेवारी (२०२४) महिन्यात काढण्यात आले होते. पुन्हा महामार्गावर अनधिकृत फ्लेक्स लावल्याची माहिती मिळत आहे. अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांनी त्वरित काढून घ्यावेत. अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पुढील आठ दिवसांत महामार्गाला अनधिकृत फ्लेक्सच्या विळख्यातून काढण्यात येईल.
-अभिजित औटे (कार्यकारी अभियंता, एनएचआय, पुणे)