पुणे : महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ जागांसाठी आज (१३. मे) मतदान प्रक्रिया पार पडली. या ११ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४३.८९ टक्के मतदान झाले, तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६०.६० टक्के मतदान झाले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले. यामध्ये नंदुरबार-६०.६०, जळगाव-५१.९८, रावेर-५५.३६, जालना-५८.८५, छत्रपती संभाजीनगर-५४.०२, मावळ-४६.०३, पुणे-४४.९०, शिरूर-४३.८९, अहमदनगर-५३.२७, शिर्डी-५२.२७ आणि बीडमध्ये ५८.२१ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक ६०.६० टक्के मतदान हे नंदुरबारमध्ये आणि सर्वात कमी ४३.८९ टक्के मतदान शिरूमध्ये झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ९ राज्ये आणि जम्मू-काश्मीरमधील एका केंद्रशासित प्रदेशातील ९६ जागांसाठी मतदान झाले. या जागांवर सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ६२.५६ टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७५.७२ टक्के आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी ३५.९७ टक्के मतदान झाले. महाराष्ट्र राज्यात ५२.४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
देशात सरासरी ६२.३१ टक्के मतदान
देशात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६२.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये आंध्र प्रदेशात-६८.०४, बिहार-५४.१४, जम्मू-काश्मीर ३५.७५, झारखंड-६३.१४, मध्यप्रदेश-६८.०१ टक्के, महाराष्ट्र-५२.४९, ओडिशा-६२.९६, तेलंगणा-६१.१६, उत्तरप्रदेश-५६.३५ आणि पश्चिम बंगालमध्ये ७५.६६ टक्के इतके मतदान झाले आहे. या आकडेवारीनुसार सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये ७५.६६ टक्के मतदान तर सर्वात कमी ३५.७५ टक्के मतदान जम्मू-काश्मीरमध्ये झाले.