सोलापूर : स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या यूडायसवर सही करण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह एका लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सोमवारी (ता.३१) सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडले आहे.
किरण लोहार ( सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी) व चैतन्य भागातील एक लिपिक असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका स्वयं अर्थसहाय्य शाळेतील व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वयं अर्थसहाय्य शाळा आहे. त्यांच्या यूडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून २५ हजार हजाराची लाच स्वीकारताना सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह एका लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडले आहे. पोलीस गुन्हा दाखल करण्याचे काम करीत आहेत.
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मागील १३ महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले तर कायमच वादग्रस्त राहिले आहे. कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नव्हती अशा तक्रारी वारंवार ऐकण्यास मिळत होत्या.