पुणे : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. या पवसामुळे शहरात अनेक झाडी पडत असलेल्या घटना घडल्या आहेत. यावेळी मुसळधार पाऊस आणि वादळी वा-यामुळे शनिवार वाड्याच्या तटबंदीवर झाड पडल्याने ऐतिहासिक वास्तूचे नुकसान झाले आहे.
लाल महालाकडून बाजीराव रस्त्याकडे जाणा-या रस्त्यावर हे झाड उन्मळून शनिवारवाड्याच्या तटबंदीवर पडले आहे. त्यामुळे पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असलेल्या ऐतिहासिक वास्तुचे नुकसान झाले आहे. झाडांच्या फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शनिवार वाड्याच्या भिंतीवर मोठे झाड पडल्याने नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी येतून हे झाड काढले, मात्र, या घटनेमुळे पुण्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वाड्याची पडझड झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस मोकळे करून देण्यात आले.