पिंपरी : गॅस रिफिलिंगच्या व्यावसायिक वादातून व्यावसायिकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास चिखली येथे जाधववाडी परिसरात घडली. यामध्ये दोघे जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अजय सुनील फुले (वय १९, रा. मोहननगर) व सहआरोपी कीर्ती भिऊलाल लिलारे अशी जखमींची नावे आहेत. हर्षल सोनावणे, श्याम चौधरी अशी आरोपींची नावे आहेत.
अजय फुले व हर्षल सोनावणे या दोघांचा जाधववाडी येथे गॅस रिफिलिंगचा व्यवसाय असून, शेजारी दुकाने आहेत. त्यांच्यामध्ये व्यावसायिक स्पर्धेतून वाद होते. या वादातून रविवारी सायंकाळी सोनवणे याने साथीदारांसह फुले यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये एक गोळी फुले याच्या दंडाला लागल्याने तो जखमी झाला. दरम्यान, साथीदार कीर्ती लिलारे यालाही मानेला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्रे फिरवत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चौधरी याला, तर चिखली पोलिसांनी सोनावणे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सोमवारी (दि. ११) लोकसभा निवडणुकांसाठी मतदान आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याची माहिती उपायुक्त शहाजी पवार यांनी दिली असून, पुढील तपास सुरू आहे.