लोणी काळभोर : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया उद्या सोमवारी (ता.१३) पार पडणार आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून, सर्व राजकीय पक्षांनी साम-दाम-दंड ही तिन्ही आयुध्दे वापरुन प्रचारात मुसंडी मारली आहे. त्यामुळे हि निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची होणार असल्याने, या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे उभ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय – मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील याच्यासह ३२ उमेदवार आपले नशीब आजमविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघातील गणितं बदलली आहेत. शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शरद पवारांसोबत आहेत. मात्र आमदारांपैकी अतुल बेणके, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, चेतन तुपे, असे पाचपैकी चौघे आमदार अजितदादांच्या गटात आहेत. त्यातच अजित पवारांनी शिरुरमधील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अमोल कोल्हेंना पाडण्याची गर्जना त्यांनी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या सोबत राहिले. तर दुसरीकडे महायुतीत शिरूर लोकसभा मतदारसंघ जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेला. त्यामुळे या निवडणुकीत उभा राहण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करून हातावर घड्याळ बांधल. आणि आढळरावांनी शिरूर लोकसभेत कोल्हे यांच्या विरोधात शड्डू ठोकला.
शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. यामध्ये शरद पवार यांच्या पाठीमागे सहानभूतीची लाट असल्याने, सुरवातीला अमोल कोल्हे हे वनवे येतील? असे बोललं जात होते. परंतु, मागच्या काही दिवसांत अजित पवारांनी असे काही डावपेच टाकून मतदारांचा कौल आपल्या बाजूने फिरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांचा मतदारसंघावरील होल्ड सुटला आहे. तर आढळराव पाटलांचे पारडं थोड्याफार प्रमाणात जड झाले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघ २००८ मध्ये अस्तित्वात आला. २००९ ते २०१९ या कालावधीत शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. दोन्ही निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला होता. पण २०१९ च्या निवडणुकीत चित्र पालटलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी बाजी मारत शिवसेनेला मोठा धक्का दिला. कारण त्यावेळच्या एकसंघ शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनीच शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली होती.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या सोमवारी (ता.१३) होणार आहे. मतदार राजाचा कौल बंदपेठीत असणार आहे. तर याचा फैसला ४ जूनला होणार आहे. यंदाही शिरूर मध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असाच सामना पाहायला मिळत आहे. मात्र उमेदवार तेच असले तरी पक्ष आणि चिन्ह मात्र वेगळं आहे. त्यामुळे याचा कोणाला फायदा तर कोणाला फटका बसणार आहे. याची राजकीय समीकरणे लवकरच स्पष्ट होतील.