पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता.13) रोजी होणार आहे. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 13 मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत. मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 5 अन्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यातील टाकवे बु., शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील बेल्हे, आंबेगाव तालुक्यातील धामणी, लाखणगाव, नागापूर, महाळुंगे पडवळ व तिरपाड, खेड तालुक्यातील कुरकुंडी, शिरूर तालुक्यातील केंदूर, तळेगांव ढमढरे, वडगांव रासाई व संविदणे या ठिकाणचे आठवडे बाजार सोमवारी (ता.13) रोजी रोजी बंद राहतील.
जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहे. तरी या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट 1862 मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात सांगण्यात आले आहे.