अचलपूर : परतवाड्याजवळील वज्जर गावात असलेल्या कालव्याच्या पाण्यात बुडून एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अनन्या सुशील एखंडे असे या मुलीचे नाव आहे. अनन्या तिची लहान बहीण आणि गावातील इतर मुलांसह आंघोळीसाठी वज्जर धरणातून बाहेर पडणाऱ्या कालव्यावर पोहोचली होती. मात्र, पाण्यात खेळत असताना पाय घसरल्याने ती कालव्याच्या खोल पाण्यात गेली आणि पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडाली.
वज्जर गावातील काही मुले नेहमीप्रमाणे कालव्यात आंघोळ करत होती. त्यांना बघून 8 वर्षांच्या अनन्यालाही पाण्यात आंघोळ करावीशी वाटली आणि तिनेही त्याच उद्देशाने पाण्यात उडी मारली. पण पाणी खूप खोल होते आणि अनन्याला पोहायलाही येत नव्हते. त्यामुळे ती पाण्यात बुडाली. आंघोळ करून सर्व मुले पाण्यातून बाहेर आली आणि अनन्या कुठेच दिसली नाही. तेव्हा तिची धाकटी बहीण अनुष्काने आरडाओरड केली.
हे ऐकून जवळच असलेल्या रामजी याने तत्काळ कालव्याकडे धाव घेतली. त्याने कालव्यात उडी मारून पाण्यात बुडालेल्या अनन्याला बाहेर काढले. यावेळी वज्जर गावात एकाने अनन्याला तत्काळ दुचाकीवरून परतवाडा येथील भन्साळी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीचा तिचा मृत्यू झाला.