योगेश शेंडगे
शिक्रापूर: शिरूर तालुक्यामधील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय वर्दळीचा आणि पुणे- नगर हायवेला जोडला जाणाऱ्या एल अँड टी फाटा रोडवर ठिकठिकाणी “लोकांचा जीव गेल्यावर रस्त्यावरचे खड्डे भरणार आहात का?” असा मजकूर लिहिलेले बॅनर झळकले आहेत. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता अशा आशयाचे बॅनर लावलेले आहेत, असे वाटते. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता हे बॅनर कोणी लावले आहेत, याची माहिती मिळू शकली नाही.
शासन आणि रस्ता हे दोन्ही चालण्यासाठी बनवले आहेत. सरकार चालत आहे, पण रस्त्यांची देखभाल होत नाही. गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित नागरिकांना त्रास होणार नाही. तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. हा तीन किलोमीटर अंतर असणारा रस्ता जागोजागी पूर्ण उखडल्याने प्रवाशांना व स्थानिक नागरीकांना नाहक त्रास होत आहे. गावातील रस्त्यांचे सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण केले जाते. परंतु, काही वर्षांनंतर या रस्त्यावर खड्डे पडतात व त्यांची दुरुस्ती लवकर केली जात नाही. त्यामुळे बरेचसे अपघात घडतात. गेल्या एक वर्षापासून पीएमआरडीएला वेळोवेळी याबाबत कल्पना देऊनही याकडे लक्ष दिले जात नाही, असे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे शाखा अभियंता जगताप यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
हे बॅनर लावले आहेत, ते योग्यच केले आहे. कारण गेली अनेक दिवसांपासून या रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडलेले आहेत. दररोज ये-जा करण्यासाठी आम्हाला याच रस्त्याचा वापर करावा लागतो. टू व्हीलर व चार चाकी कार जोरात या खड्ड्यांमध्ये आदळते. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, हीच संबंधित विभागाकडे मागणी आहे.
-अक्षय ढमढेरे, स्थानिक नागरिक ,तळेगाव ढमढेरे