पुणे: प्रतिनिधी पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सोमवारी (दि. १३) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तत्पूर्वी, ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचे घरून मतदान (पोस्टल वोट) करण्यासाठी योन्ही मतदारसंघांतून ९७३ मतदारांनी अर्ज भरून दिले होते. त्यानुसार अखेरच्या तीन दिवसांत ९१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यातील काही ज्येष्ठ मतदारांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाइकांकाडून कळविण्यात आले. काही मतदारांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने या मतदारांची घरून मतदान करण्याची वेळ संपुष्टात आली आहे, तर सीमेवर असलेल्या १०९ मतदारांचे मतदान केलेल्या पत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त आल्या आहेत.
लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्यात पुणे आणि शिरूर लोकसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ मतदार आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक शारीरिक व्यंग असणान्या दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार दोन्ही मतदारसंघांतील धरून मतदान करण्याच्या तारखा निश्चित करून प्रथम संबंधित मतदारांकडून प्रथम अर्ज भरून घेत सहमती घेण्यात आली होती.
पुणे लोकसभा मतदासंघात ४६३ मतदारांनी घरून मतदान करण्यासाठी अर्ज केले असून मागील दोन दिवसांत ४४० मतदारांनी घरी बसून मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, ४२ दिव्यांग मतदारापैकी ४१ मतदारांनी धरून मतदान केले आहे, तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून ८५ वर्षांपुढील अर्ज भरून देणाऱ्या ३८१ मतदारापैकी ३५१ आणि ८७ दिव्यांग मतदारांपैकी ८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षांपुढील दोन ज्येष्ठ मतदारांचा मृत्यू झाला आहे, तर पुणे मतदारसंघातील चार ज्येष्ठ मतदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अर्ज भरून देणाऱ्या उर्वरित मतदारांपैकी पत्त्यावर अनुपस्थित असल्याचे तर काहींनी मतदान करण्यास नकार दिला असल्याची माहिती पोस्टल मतदान विभागाचे समन्वयक दत्तात्रेय कवितके यांनी दिली.
पुण्यातील ३३, शिरूरमधील ७६ सैनिकांचे मतदान
जिल्ह्यात लष्करी, निमलष्करी, केंद्रीय सशस्त्र पोलीस बल आदी सैन्य दलातील जवान यांनाही इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिम (इंटीपीबीएस) या संगणकीय प्रणालीद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. चारही लोकसभा मतदारसंघांमधून ५१४५ पुरुष, तर ३४२ महिला अशा एकूण ५४८७ जवान मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी पुणे लोकसभा मतदारसंघातून ८९६ मतदारांपैकी ३३, तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून २०४८ मतदारांपैकी ७६ जवान मतदारांनी इंटीबीपीएस प्रणालीद्वारे मतदान करून संबंधित मतपत्रिका बंद पाकिटाद्वारे मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे. ईटीबीपीएस प्रणालीद्वारे मतदान करण्यासाठी सैनिक मतदारांना ४ जून (मतमोजणी) सकाळी आठ वाजेपर्यंत मुदत असणार आहे.