पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच कॉंग्रेस रवींद्र धंगेकर यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
पुण्यात पैशांचे ट्रक आले आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं वाटप होणार आहे. मतदानाला दोन दिवस राहिले असताना, भाजपाचे कार्यकर्ते, पोलीस, गुन्हेगार यांची दादागिरी सुरू झाली आहे. पुण्यामध्ये पैशांचे ट्रक येऊन थांबले आहेत. या ट्रकमधील पैशांचं देवेंद्र फडणवीस आज वितरण करतील. या निवडणुकीसाठी भाजपानं प्रचंड पैसा आणला आहे.
प्रत्येक कार्यकर्त्याकडे करोडो रुपये आहेत. तसेच ते वाटायला आता सुरुवात करतील. पोलीस खातं, निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करणार, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोग देशाचं ऐकत नाही तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं काय ऐकणार, असंही रवींद्र धंगेकर यावेळी म्हणाले.
धंगेकर यांना स्टंटबाजी करायची सवय : मुरलीधर मोहोळ
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना प्रत्युत्तर देत म्हणाले धंगेकर यांना स्टंटबाजी करायची सवय झाली आहे. कुठलं तरी स्टेटमेंट करायचं मोठ्या नेत्यांवर बोलायचं. मात्र पुणे कर सुज्ञ आहेत. त्यांना सगळं समजतं. एक दोनदा केलेलं पचून जातं. मात्र, वारंवार असं केलं तर लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत, असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे.