पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तब्बल 11 वर्षांनी निकाल आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना निर्दोष, तर दोघांना दोषी ठरवले आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांना जनमठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर, विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तिघांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉक करत असताना दाभोलकर यांची दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात या हत्येप्रकरणी खटला सुरु झाला होता. तब्बल 11 वर्षांचा काळ लोटल्यानंतर या प्रकरणात न्यायालयाने आपला निर्णय देत आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागले होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येप्रकरणी आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर 15 सप्टेंबर 2021 ला आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयात या खटल्याची वर्षभर सुनावणी झाली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर हे दोघेजण सध्या जामिनावर बाहेर आहेत.
कट रचल्याचा आरोप असलेल्या आरोपी वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आल्याने दाभोलकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणात दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. परंतु, निर्दोष सुटलेले आरोपी आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ, असे हमीद दाभोलकर यांनी म्हटले आहे.