नवी दिल्ली: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मोठी कामगिरी नोंदवली. कोहलीने 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या या मोसमात 600 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. यासह त्याने ऑरेंज कॅप शर्यतीत अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे. कोहलीने आयपीएलच्या एकाच मोसमात चौथ्यांदा 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. एका मोसमात सर्वाधिक वेळा 600 हून अधिक धावांचा टप्पा गाठणारा तो संयुक्तपणे पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने केएल राहुलची बरोबरी केली. राहुलने आयपीएलच्या एकाच मोसमात 4 वेळा 600 हून अधिक धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने चालू मोसमात 12 डावांत सहाव्यांदा अर्धशतक केले. या मोसमात त्याने पंजाब किंग्जविरुद्ध दोनदा अर्धशतके झळकावली तर कोलकाता, राजस्थान, हैदराबाद आणि गुजरातविरुद्धही त्याने अर्धशतके झळकावली. आयपीएलमध्ये 3 संघांविरुद्ध 1000 धावा करणारा कोहली लीगमधील पहिला फलंदाज ठरला आहे. या काळात त्याने पंजाबविरुद्ध त्याच्या 1000 धावाही पूर्ण केल्या. विराटने दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध एक हजार धावा केल्या आहेत.