नागपूर : एका तरूण-तरूणीचा ब्रेकअप झाला होता. या ब्रेकअपनंतर प्रेयसी प्रियकरासोबत बोलतही नव्हती. याच रागातून एका तरुणाने ती काम करत असलेले दुकानच पेटवून दिले. या आगीत दुकानातील सर्व सामान जळून राख झाले. ही घटना तहसील पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
प्रकाश रमेश चट्टे (रा. आजरी-माजरी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दुकान मालक रितेश सुदामा मकीजा (रा. वर्धमाननगर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. मकीजा यांचे बोहरा मशीद गल्लीत स्टेशनरीचे दुकान आहे. नियमित कामकाज करून मकीजा दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या दुकानाजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने मकीजा यांना फोन करून दुकानातून धूर निघत असल्याची माहिती दिली. त्यानंतर मकीजा तत्काळ दुकानात पोहोचले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांसह अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मार करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते.
सीसीटीव्हीत घटना कैद
पोलिसांना तपासादरम्यान एका संशयित तरुणाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दुकानाच्या शटरमधून ज्वलनशील पदार्थ टाकताना दिसत होता. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी प्रकाश चट्टेला अटक केली. अटक झाल्यानंतर त्याने दुकानाला का आग लावली याची कबुली दिली. ब्रेकअप झाल्यानंतर हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.