रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ५९.२३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४ लाख ८ हजार ७४५ पुरुष, तर ३ लाख ९८ हजार ८१६ महिला असे एकूण ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार झाला नसून सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. येथे भाजपचे हेवीवेट उमेदवार नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यात कोणाला • मतदारांची पसंती मिळाली, याकडे मतदारसंघातील सर्वांचे लक्ष लागले आहे. चिपळूण १ लाख ४१ हजार ९५८ (५२.६२ टक्के), रत्नागिरी १ लाख ६२ हजार ९२७ (५७.४६), राजापूर १ लाख १० हजार ५७५ (४७.३१), कणकवली १ लाख २५ हजार ५७२ (५५. १४), कुडाळ १ लाख २९ हजार ४५०, (६०.९६) आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १ लाख ३७ हजार ८० (६१.०७) मतदारांनी मतदान केले.