उरुळी कांचन : अलीकडच्या काळात कोणताही कार्यक्रम मोठा करणे हा एक इव्हेंट बनला आहे. त्या निमित्ताने नागरिक भला मोठा खर्चही करतात. मात्र हा होणारा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजाचे काहीतरी देणे असतो. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील टिळेकर वस्ती जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुरलीधर कुंजीर (Ramesh Kunjir) यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी (Retirement Day) त्यांच्या वजनाइतकी पुस्तकांची तुला केली. आणि आपण ज्या शाळेत ज्ञानदानाचे पवित्र काम केले आहे. त्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ५५० पुस्तकांचे मोफत वाटप (Free distribution of books) केले आहे.
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील कुंजीर लोन्स येथे रमेश कुंजीर यांचा सेवापुर्तीचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. यावेळी हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघ व पतसंस्थेच्या वतीने तसेच तालुक्यातील शिक्षक बांधवांचे वतीने रमेश कुंजीर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, उपाध्यक्ष विकास शेलार, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंडे, कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, केंद्र प्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जगताप, नेते राजेश काळभोर, रमेश कुंजीर यांचे आई वडील, पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, तसेच केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व सरांचा मित्र परिवार, नातेवाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश कुंजीर हे साष्टे (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून फेब्रुवारी १९८६ ला रुजू झाले. त्यानंतर त्यांनी कडशितोळे वस्ती, शिंदवणे, नायगाव, उरुळी कांचन येथील पांढरस्थळ, व खुटबाव (ता.दौंड) येथील शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम केले. आणि ३८ वर्ष सेवा केल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिळेकरवस्ती,(ऊरूळी कांचन ) येथे मुख्याध्यापक पदावर सेवेतून निवृत्त होण्याचा दिवस आला. हा दिवस काहीतरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा असावा. या उद्दिष्ठाने कुटुंबाने सेवापुर्तीच्या दिवशी सरांच्या वजनाइतक्या पुस्तकांची तुला करून ही पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या, सेवा केलेल्या शाळेतील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांच्या मार्फत ही पुस्तके सहा शाळेत वाटप करण्यात आली.
दरम्यान, हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्षपद रमेश कुंजीर यांनी भूषविले आहे. त्याचबरोबर हवेली तालुका शिक्षक पतसंस्थेत चेअरमन व संचालक पदावर काम करून अनेक बांधवांना पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे. शिक्षक संघटनेत काम करत असताना सहकाऱ्यांच्या मदतीने पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक दोन वेळा बिनविरोध केली आहे. कुंजीर यांनी अध्यक्ष पदावर कार्यरत असताना आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. कुंजीर यांनी शिक्षकांच्या समस्या योग्यप्रकारे हाताळून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप गायकवाड, प्रकाश चौधरी, महेंद्र मोरे, गणेश मेमाणे, युवराज ताटे, संतोष वनकुद्रे, सारीका ताटे, रेश्मा शेख व शिंदवणे केंद्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी आणि शिक्षणा फाऊंडेशनच्या आधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दुर्गा देशपांडे, मुकेश इंगवले यांनी केले तर आभार उज्ज्वला नांदखिले यांनी मानले
रमेश कुंजीर यांचे होतेय सर्वत्र कौतुक
सेवापुर्तीच्या कार्यक्रमाला होणारा अनावश्यक खर्च टाळून रमेश कुंजीर यांनी त्यांच्या वजनाइतकी विद्यार्थ्यांसाठी पुस्तके वाटप केली आहे. त्यांचा हा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. रमेश कुंजीर यांचे व त्यांनी राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश कुंजीर म्हणाले, शाळेसारखे दुसरे मंदिर नाही आणि विद्यार्थ्यांसारखा दुसरा देव नाही. विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू असतो. आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्यासारखे अनेक शिक्षक प्रयत्न करीत असतात. या ३८ वर्षाच्या कालावधीत अनेक विद्यार्थी चांगले नागरिक म्हणून नावारूपाला आले आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटते. ज्ञानदानाचे पवित्र काम माझ्या हातून घडले. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. व निरोप समारंभाला जमलेल्या माझ्या हितचिंतकांचे आभार मानतो.