करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघात मतदान संपण्यासाठी अवघे काही मिनिटे बाकी असताना करमाळा शहरात एका माथेफिरू तरूणाने एका मतदान केंद्रात चक्क हातोडी घालून ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर या माथेफिरू तरूणाला तात्काळ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
जयवंत दिलीप कांबळे (रा. करमाळा) असे ईव्हीएम फोडणाऱ्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती. माढा लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या करमाळा विधानसभा क्षेत्रात करमाळा शहरात नगरपालिका मुलांची प्राथमिक शाळा क्र. २ च्या इमारतीत मतदान केंद्रावर दिवसभर मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेने सुरू होती. संध्याकाळी मतदान संपायला शेवटची काही मिनिटे बाकी असताना काही मतदार रांगेत उभे होते. त्यापैकी जयवंत कांबळे नावाचा तरूण आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात गेला.
त्याने सर्व प्रक्रिया पूर्ण करून तो ईव्हीएम मशीनजवळ गेला. त्यानंतर हळूच पॅन्टच्या खिशातून हातोडी बाहेर काढत ईव्हीएम मशीनवर मारली. यामध्ये ईव्हीएम मशीन फोडली गेली. कांबळे याने हातोडी मारल्याचा जोराचा आवाज येताच मतदान केंद्रात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, सहायक निवडणूक अधिकारी तथा करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक विनोद घुघे यांनी संबंधित मतदार केंद्राला भेट दिली. जरी ईव्हीएम मशीन फोडली असली, तरी त्याजवळ असलेल्या व्हीव्हीपॅट मशीनवर दिवसभर झालेल्या मतदानाचा डाटा सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.