पुणे : पुण्यातील येरवडा कारगृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारागृहात चार कैद्यांनी मिळून पोलीस हवालदाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहाच्या नवीन गेट जवळ घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपूर्व संजय खंडागळे, सुरज नारायण आडागळे, आनंद उर्फ सोनू सिद्धेश्वर धड, नीरज लक्ष्मण ढवळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार नानासाहेब रामचंद्र मारणे (वय-५७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार नानासाहेब मारणे हे येरवडा कारागृहात कार्यरत असून सी. जे विभागात ते नेमणुकीस होते. कारागृहात नवीन यंत्रणा बसविण्यासाठी भिंत पाडून नवीन बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड पडलेले आहेत. दरम्यान, कोणालाही दुखापत होऊ नये म्हणून या ठिकाणी कैद्यांना येऊ देऊ नका, असे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आलेले आहेत.
यावेळी मारणे आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी खंडागळे, अडागळे, धड, ढवळे हे त्या ठिकाणाहून जात होते. त्यावेळी त्यांना मारणे यांनी अडवले. आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. मारणे यांच्या हातातील लाठी हिसकावून घेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत मारणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करत आहेत.