कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी मतदान सुरु असतानाच कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर एका वृद्ध मतदाराचा हृदयविवकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मतदान केंद्रावरच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. मतदान करण्यासाठी आलेल्या महादेव श्रीपती सुतार (वय 69, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) यांना रांगेमध्ये उभे असताना चक्कर आल्याने ते जागेवरच खाली पडले. त्यानंतर त्यांना नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार महादेव सुतार हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यांचे मतदान हे रमाबाई आंबेडकर शाळेतील केंद्रावर होते. मतदानासाठी रांगेत उभे असतानाच ते चक्कर येऊन खाली पडले. ही गोष्ट लक्षात येताच मतदान केंद्रातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नातेवाईकांनी सुतार यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली आहे.