पुणे : दौंड रेल्वे जंक्शन या स्थानकाचा सोलापूरऐवजी पुणे रेल्वे विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. दौंड जंक्शन आतापर्यंत सोलापूर विभागात होते, सोलापूर विभागातून ते आता पुणे विभागात देण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागांच्या अधिकारक्षेत्रात रेल्वे बोर्डाकडून बदल करण्यात आला आहे. दौंड हे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील महत्वाचे जंक्शन असून पुणे शहराच्या जवळ आणि रेल्वेच्या तांत्रिक बाबींसाठी पुणे विभागाला सोयीचे असल्याने हा बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, दौंड रेल्वे जंक्शन या स्थानकाचा सोलापूरऐवजी पुणे रेल्वे विभागात समाविष्ठ करणे अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र, केंद्र सरकारने २१ फेब्रुवारीला एका अधिसूचनेद्वारे दौंड जंक्शनचा पुणे विभागात समावेश करण्यास मंजुरी दिली होती. आता मात्र रेल्वे बोर्डाकडून सोलापूरऐवजी पुणे रेल्वे विभागात प्रत्यक्ष बदल करण्यात आला आहे. त्यामुळे दौंड- पुणे- दौंड दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, नागरिक, रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पेन्शनर्स, वाहतूकदार यांना त्याचा फायदा होणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यासह विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये पुणे विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत देखील चांगली कामगिरी केली आहे. एप्रिल महिन्यात पुणे रेल्वे विभागाने केवळ मालवाहतूकीतून 54 कोटी 91 लाख रुपयांची कमाई केली आहे.
एप्रिल 2024 महिन्यात पुणे विभागाने 0.2924 मेट्रिक टन सामान लोडींग केले आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 0.2339 मेट्रिक टन सामान लोडींग केले गेले होते. एप्रिल 2024 महिन्यात साखरेचे 52 रेक लोड केले. जे मागील महिन्यात 49.5 रेक आणि मागील वर्षी एप्रिल महिन्यात ही संख्या 17 रेक होती. तसेच या महिन्यात 544 क्रॅक ट्रेन चालवल्या आहेत.