कन्नड : दांडेली तालुक्यातील हलामदी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेने पतीसोबत वाद झाल्यानंतर तिच्या 6 वर्षांच्या मुलाला कालव्यात फेकून दिलं आहे. या घटनेनंतर मुलाला शोधण्यासाठी गेलेल्या शोध पथकाला मुलाचा मृतदेह मगरीच्या जबड्यात असल्याचे दिसले. त्यावेळी मुलाचा मृतदेह पाहिल्यावर त्याचा अर्ध्याहून अधिक भाग मगरीने खावून टाकला होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे.
यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील हलामदी गावात ही घटना घडली आहे. येथे महिला सावित्री (वय-32) आणि तिचा पती रवी कुमार (वय-36) या दोघांना या प्रकरणामुळे अटक केली. या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सहा वर्षांचा मुलगा विनोदला बोलता व ऐकता येत नव्हते. तो सामान्य मुलांसारखे बोलू शकत नव्हता आणि ऐकू ही शकतं नव्हता. यामुळे दोघा पती-पत्नीत सतत वाद व्हायचे. या कारणामुळे महिलेने पतीसोबत वादा झाल्यानंतर तिच्या 6 वर्षांच्या मुलाला कालव्यात फेकून दिलं आहे.
पत्नी सावित्री आणि पती रवि यांच्यात शनिवारी मुलावरुन खूप मोठं भांडण झालं होतं. त्यानंतर सावित्रीने रात्री जवळपास 9 वाजता मुलगा विनोद याला कालव्यात फेकून दिले. हा कालवा पुढे जाऊन काळी नदीला मिळतो. या नदीत असंख्य मगरी आढळतात. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. मात्र, तरीही रात्री त्या मुलाचा शोध लागला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी शोधपथकाने मगरीच्या जबड्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. मगरीने मुलाचा उजवा हाताचा काही भाग खाल्ला होता. तर, त्याच्या शरीरावरही गंभीर जखमा होत्या. आरोपी दाम्पत्य राजमिस्त्री आणि मोलकरीण म्हणून काम करत होते. दोघांनाही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडित पाठवण्यात आले आहे.
महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, या घटनेसाठी महिलेचा पती जबाबदार आहे. तो वारंवार म्हणायचा की मुलाचा मृत्यू होऊदेत. तो फक्त खायचं काम करतो. माझे पती सतत हेच म्हणायचे. माझा मुलगा किती अत्याचार सहन करणार. मी माझं दुख कुठे सांगायला जाऊ, असा आरोप महिलेने तिच्या पतीवर केला आहे. या घडलेल्या घटनेमुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे.