लोणी काळभोर, (पुणे) : स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करुन त्याच्या मोबदल्यात चांगला परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवून एका सायबर चोरट्याने कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका महिलेला सुमारे ३ लाख ४१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
याप्रकरणी कदमवाकवस्तीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांना अज्ञात सायबर चोरट्याने मोबाईलवरून संपर्क केला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक करुन त्यामधुन तुम्हाला चांगला परतावा मिळवून देतो. असे आमिष दाखविले. दरम्यान, या अमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी ऑनलाईन माध्यमाव्दारे सायबर चोरट्यांना वेळोवेळी ३ लाख ४१ हजार ५०० रुपये पाठविले. मात्र, सायबर चोरट्याने कोणताही परतावा परत न देता फसवणूक केली. फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठून अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात फिर्याद दिली.
त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधायक कलम ४१९, ४२० व माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क) (ड) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण करीत आहेत.