राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनित्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील वरवंड येथे आज सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर टीकेची झोड उडवली आहे. “जन्माला येताना तोंडात सोन्याचा चमच्या घेऊन येणाऱ्यांना शेती माहिती नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
भीमा पाटस कारखाना बंद पाडण्याच्या रोहित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत अजित पवार म्हणाले, मी कारखाना बंद पाडणारा नाही, तर कारखाना चालवणार आहे. महाराष्ट्रातील बंद पडलेले सगळे कारखाने माझ्या नावावरच टाकतील. तसेच कोणीही कोणाचे पाणी अडवत नाही, आम्ही पाणी देण्यासाठीच येथे बसलो आहे.
मात्र, भांड्यात पाणी शिल्लक असेल तरच पाणी देता येईल. टीका करणाऱ्यांना माहितच नाही की पाणी कुठे शिल्लक असते आणि कुठे नसते. कारण जन्माला येताना तोंडात सोन्याचा चमच्या घेऊन येणाऱ्यांना शेतीची माहिती नाही, यांना विचारले मका कसली, तर ज्वारीला मका म्हणतील, गहू लहान असताना गहू आहे का? तांदूळ हे सुद्धा सांगता येणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, देशात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे वातावरण आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी माहितीच्या माध्यमातून राज्याचा निधी आणण्याचं काम केलं. पण दौंड व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रेल्वेचे प्रश्न, शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राच्या निधीची आवश्यकता असते. गेल्या १० वर्षात बारामती मतदारसंघांमध्ये जी निधी आलेला आहे, तो राज्याचा आहे. केंद्रात विरोधी विचारांचा खासदार असल्यामुळे आपल्याला हक्काने निधी आणता आलेला नाही. त्यामुळे अनेक योजना रखडलेल्या आहेत, असंही अजित पवार म्हणाले.