खेड-शिवापूर : चार ते पाच जणांनी मुलाला मारहाण करून त्याचे अपहरण केल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी पोलिसात गेले असता, पोलिस अपहरणाची तक्रार न घेता फक्त मारहाण केल्याची तक्रार घेत आहेत. नटवरलाल विश्वकर्मा असं अपहरण केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत गोविंदलाल विश्वकर्मा यांनी शिंदेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गोविंदलाल विश्वकर्मा यांचा १९ वर्षाचा मुलगा नटवरलाल विश्वकर्मा हा गतीमंद आहे. २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास तो वेलू येथील घराजवळ खेळत असताना अचानक गायब झाला. त्यामुळे २९ एप्रिल रोजी गोविंदलाल यांनी त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान, दोन दिवसांनी शेजारील हॉटेल चालक, एक महिला आणि हॉटेल चालकाचे कामगार यांनी माझ्या मुलाचे अपहरण झाल्याच्या चार दिवस आधी बेदम मारहाण केली होती. त्यांनीच माझ्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार देण्यासाठी गोविंदलाल शिंदेवाडी पोलिस चौकीत गेले. मात्र, पोलिसांनी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार न घेता फक्त मुलाला मारहाण केल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोलताना गोविंदलाल विश्वकर्मा म्हणाले, ज्यांनी माझ्या मुलाला मारहाण केली. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्या मारहाण करणाऱ्यांनीच माझ्या मुलाचे अपहरण केले आहे. मात्र, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी विश्वकर्मा यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करूनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत. उद्या माझ्या मुलाचं काही बर वाईट झाले तर त्याला पोलिस आणि मारहाण करणारे जबाबदार असतील असा इशारा मुलाचे वडील गोविंदलाल विश्वकर्मा यांनी दिला आहे. याबाबत राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.