जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पाच लष्कराचे जवान जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायु सेना (आयएएफ) च्या एक वाहनावर तसेच सुरक्षा दलांच्या ताफ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला.
दरम्यान, या हल्ल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. घटनास्थळी असलेली वाहने हवाई तळाच्या आत शाहसीतारजवळील भागात सुरक्षित करण्यात आल्याचे सुरक्षा दलातील अधिकाऱ्याने सांगितले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत. अधिक माहितीची प्रतीक्षा असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुंछमध्ये दहशतवाद्यांचे पुन्हा एकदा भ्याड कृत्य समोर आले. सुरणकोटच्या सनाई गावात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या दोन वाहनांवर गोळीबार केला. या घटनेत हवाई दलाचे ५ जवान जखमी झाले आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जखमी जवानांना पुढील उपचारासाठी उधमपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराबंदी घालून शोधमोहीम सुरू केली असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.