पुणे : पुण्यात रिक्षा चालकाने शालेय विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित रिक्षाचालकाविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास शिंदे (३५, रा. कलवड, लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालक आरोपीचे नाव आहे.
एक मे रोजी सकाळी सातच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी ही नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी रिक्षाने निघाली. संबंधित मुलगी ही अल्पवयीन आहे, हे रिक्षा चालकाला माहीत होते. तरी देखील त्याने मुलगी रिक्षामध्ये एकटी असल्याची संधी साधून एका महाविद्यालयाजवळ रिक्षा उभी करत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
तसेच मुलीचे फोटो काढण्याच्या उद्देशाने तिच्या गालाला वाईट हेतूने गाल लावून अश्लील चाळे केले. यानंतर रिक्षा पुढे घेऊन जात चंदननगरमधील साईबाबा कमानीसमोर पीडित मुलीला स्वत:च्या शेजारी बसवत अश्लील स्पर्श करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक मेढे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.