अंबाजोगाई : पत्नी बाहेर नोकरी करत असल्याने आणि घटस्फोटाची तक्रार दिल्याच्या रागातून दारुड्या पतीने पत्नीच्या पोटात चाकूने भोसकले. या प्राणघातक हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. ही खळबळजनक घटना अंबाजोगाई शहरातील अंबिका कॉलनीत घडली.
भाग्यश्री मयूर शर्मा (वय 38, रा.अंबाजोगाई) असे त्या जखमी पत्नीचे नाव आहे. बारा वर्षांपूर्वी भाग्यश्रीने घरच्यांचा विरोध झुगारून मयूर बाबूलाल शर्मा (सध्या रा. छत्रपती चौक, अंबाजोगाई) याच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. मयूरची बहिण कोमल पंचारिया यांच्या फिर्यादीनुसार, मागील सहा वर्षांपासून मयूर दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे मयूरचा पत्नी भाग्यश्री आणि आई-वडिलांसोबत सतत वाद होत होता. त्यातच भाग्यश्री बाहेर नोकरी करू लागल्याने त्यावरून तिच्यावर राग असायचा.
मागील वर्षभरापासून ती एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होती. मयूरच्या त्रासाला कंटाळून भाग्यश्री काही दिवसांपासून मानवलोक संस्थेच्या मनस्विनी प्रकल्पात राहत होती आणि तिथूनच तिने मयूर विरुद्ध घटस्फोटाची तक्रार दिली होती. मयुरने भाग्यश्रीला रुग्णालयाच्या बाहेर बोलावले आणि ते दोघे अंबिका कॉलनीतील हनुमान मंदिराकडे गेले.
तिथे मंदिरासमोर मयूरने सोबत आणलेला चाकू बाहेर काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने भाग्यश्रीच्या पोटात भोसकले आणि निघून गेला. हा वार एवढा भयंकर होता की भाग्यश्रीच्या पोटातील आतडी बाहेर आली.