पिंपरी-चिंचवड : सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, अंगाची लाहीलाही होत असताना महावितरणामुळे (Mahavitaran)
वारंवार वीज पुरवठा (Power Supply) खंडित होत आहे, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) नागरिक विजेच्या समस्यांनी हैराण झाले आहेत. त्यामुळे अनेकजण महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त करत असून, या विरोधात कोण आंदोलन करत आहे तर, कोण निवेदन देऊन तक्रारी करत आहे. चिखली, मोई, मोशी, निगडी, आकुर्डी आणि भोसरी भागात महावितरणच्या समस्या वारंवार भेडसावत आहेत.
शहरातील अनेक ठिकाणी नागरिक थेट महावितरण अधिकाऱ्यांना भेटून तक्रारींचा पाढा त्यांच्यासमोर वाचत आहेत. मोशी व चिखली परिसरात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे याबाबत कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत आहे. रात्री-अपरात्री कधीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने आणि सध्या उष्णता वाढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
चिखली परिसरातदेखील अनेक लहान-मोठे लघुउद्योग आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योगांचे कामकाज बंद पडत आहे. या सर्व परिस्थितीवर ग्रामस्थांनी तसेच परिसरातील युवा नेत्यांनी महावितरणच्या विरोधात आंदोलन अन् मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे वाकड, थेरगाव परिसरातदेखील वारंवार वीज समस्या भेडसावते. सकाळी महापालिकेकडून पाणी येण्याच्या वेळेस नेमकी वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. जुन्या व जीर्ण झालेल्या केबल्स आणि वाढता ताण यामुळे ही समस्या होत असल्याचे सांगण्यात येत आहे.