नाशिक: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे दोन टप्पे पार पडले तरी महायुतीचं जागावाटप पूर्ण झालेले नाही. कल्याण, ठाणे, नाशिक आणि पालघरच्या जागेवरील उमेदवार निश्चित झालेले नव्हते. काहीवेळापूर्वी ठाणे, कल्याण आणि नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली आहे. शिवसेनेने दोन तासांपूर्वी ठाणे आणि कल्याण लोकसभा जागेवर त्यांचे उमेदवार जाहीर केले. त्यानंतर आता नाशिकचा उमेदवार देखील जाहीर केला आहे.
शिवसेना पक्षाने नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा नाशिकमधून लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे आव्हान असणार आहे. महायुतीने ४८ पैकी ४७ जागांवरील त्यांचे उमेदवार दिले असून आता केवळ पालघरच्या जागेबाबतचा निर्णय घेणे बाकी आहे. नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ शेवटचे दोनच दिवस उरले आहेत. त्यमुळे हेमंत गोडसे २ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.